आपल्या पूर्वजन्माची कथा सांगताना नारदजी म्हणाले हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसम्पन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी जरी लहान होतो, तरीपण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे, इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्याबागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन-पूजन करीत असत, त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीलागानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ति भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले.
हे महामुनि, जसजशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली, तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिरबुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारणरूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्मास्वरूप आत्म्यामध्ये, "ही माया आहे," अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्षा आणि शरद या दोन ऋतुकालांत ते महात्मे दिवसातून तिन्ही वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता, ते ज्ञान, त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन, तेथून जातेवेळी मला दिले. त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो. जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते.
पुढे नारद म्हणाले - मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एक तर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मलासुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे; परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करून शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधार नाचवील तशी नाचते, त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. आईच्या स्नेहबांधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त पाच वर्षांचा असल्याने मला दिशा, देश, काळ यांविषयीचे काहीही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गाईची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळप्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणार्या भगवंतांचीच ही कृपा आहे, असे समजून मी उत्तर दिशेला निघालो.
नारदजी पुढे म्हणतात, “चालताना मी थकलो होतो. भूकही लागली होती. जवळच्या तलावात आंघोळ करून पाणी प्यायलो आणि पिंपळाच्या झाडाखाली बसलो. त्या महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे तो भगवंताच्या चरणी ध्यान करू लागला. ध्यान करताना मनाला अश्रू आल्यासारखे वाटले, शरीर रोमांचित झाले आणि मग अचानक देवाचे दर्शन झाले. नारदजी त्यांना पुन्हा भेटण्यासाठी हताश झाले आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले.
तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखविली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळे तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलीन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा, सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्याच्या त्या कृपेची अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लववून नमस्कार केला. त्या वेळेपासून मी लज्जा, संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो. ईच्छा आकांक्षा आणि मद मत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशाप्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्णपरायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी, त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला.
माझी प्रारब्धकर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत्-पार्षद-शरीर प्राप्त होण्याची वेळ आली, तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरविले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतः मध्ये विलीन करून प्रवेश करू लागले, तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. एक हाजार चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियांतून मरीची आदी ऋषींसह मीही प्रगट झालो. तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. भगवद्भजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी या स्वरब्रह्मविभूषित [सारेगमपधनी या सात स्वरांना ब्रह्मरूप मानले जाते.] वीणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो.
ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो, आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे, ते भगवंत, मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो, तेव्हा बोलाविल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. ज्यांचे चित्त नेहमी विषय-भोगाच्या कामनेने आतुर झालेले असते, त्यांच्यासाठी, भगवंतांच्या लीलांचे कीर्तन, संसारसागरातून पार होण्याचे जहाज आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्णसेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम-नियम आदी योगमार्गांनी शांती प्राप्त होत नाही. हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात. आपण मला जे विचारले होते, ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोषप्राप्तीचा उपाय मी सांगितला.
असे बोलून नारदजी तेथून निघून गेले, त्यानंतर व्यासजींनी आपले चित्त एकाग्र केले आणि भक्ती केली आणि शेवटी भगवंत आणि त्यांची माया पाहिली. त्याला कळले की मायेने मोहित झालेल्या प्राण्याला, भगवंताच्या शक्तीवर मात करण्यासाठी भक्ती करावी लागते. असा विचार करून त्यांनी भागवत रचले, जे केवळ श्रवण केल्याने जीवाला श्रीकृष्णाचे शुद्ध प्रेम प्राप्त होते. भागवतांना पुढे नेण्यासाठी त्यांनी ते त्यांचे पुत्र शुकदेवजी यांना शिकवले.
पुढे शौनकजींनी सूतजींना विचारले की शुकदेवजींनी काय साध्य करण्याच्या इच्छेने भागवत वाचले? तेव्हा सूतजी म्हणाले की, जे ज्ञानी आहेत, ज्यांच्या अज्ञानाची गाठ सुटली आहे आणि जे सदैव आत्म्यामध्ये रममाण आहेत, ते मुक्त होऊनही भगवंताची निःस्वार्थ भक्ती करतात; कारण भगवंताचे गुण इतके गोड आहेत की ते प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करतात. तेव्हा श्री शुकदेवजी हे भगवंतांच्या भक्तांचे अत्यंत प्रिय असून ते स्वतः भगवान वेदव्यासांचे पुत्र आहेत. भगवंताच्या गुणांनी त्याचे हृदय आकर्षित केले आणि त्याला या विशाल ग्रंथाचा अभ्यास करण्यास भाग पाडले.